नांदेड - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga Campaign ) उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक नवा मापदंड निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृतमहोत्सवी वर्षाचा आनंद व आत्मिक समाधान घेता यावे. या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जि.प. कर्मचारी आणि बचत गटांतर्फे तिरंगा पोहोचवण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
Har Ghar Tiranga Campaign दारिद्र्यरेषेखाली व्यक्तींना तिरंगा देणार - बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींच्या सहमतीने “हर घर तिरंगा’ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ( Har Ghar Tiranga Campaign ) जिल्हा परिषदेचे 11 हजार 900 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचारी आपल्या वैयक्तिक घरासह गरजू 3 व्यक्तींना तिरंगा देईल. एकट्या जिल्हा परिषदेमधून जवळपास 50 हजार गरीब, दारिद्र्यरेषेखाली व्यक्तींना आपला तिरंगा देण्यात येणार आहे.
विद्यार्थी योगदान देणार - तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जि.प.चे सर्व आजी- माजी लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागासाठी स्वयंस्फूर्तीने तत्पर आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी योगदान देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केला. ( Har Ghar Tiranga Campaign ) बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभागांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.
बचत गटांतर्फे 79 हजार कुटुंबांपर्यंत तिरंगा -जिल्ह्यात 16 नगरपरिषदा असून या क्षेत्रातील 121 बचत गटांमार्फत सुमारे 79 हजार कुटुंबांपर्यंत तिरंगा पोहोचवण्याचे नियोजन आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1 हजारपेक्षा अधिक बचत गट आहेत. सर्व बचत गटांना सहभागी करून घेण्याबाबत माविमतर्फे नियोजन केल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने म्हणाले.
हेही वाचा -Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20557 कोरोना रुग्णांची नोंद, तर 40 रुग्णांचा मृत्यू