नांदेड - किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेला 23 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे वर्षभरानंतरही जप्त करण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही.
या घटनेचा तपास योग्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी मृताचे भाऊ विलास नाईक यांनी केली आहे. संबंधित घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी समाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची बदली करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली नसल्याचा आरोप यावेळीही झाला.
किनवट शहरातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण पुढील तपासासाठी पोलीस उप-अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे सोपवण्यात आले. मात्र, नुकतीच त्यांची बदली झाल्याने पुन्हा प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उप-अधीक्षक हसन यांच्याकडेच पुन्हा तपासाची सूत्रे देण्यात यावीत, अशी मागणी विलास नाईक यांनी केली आहे.
२३ ऑगस्ट २०१८ रोजी सुरेखा यांचा खून झाला होता. त्यावेळी कुटुंबीयांसमोर पंचनामा केल्याशिवाय मृतदेह उचलू नये, अशी विनंती विलास नाईक यांनी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना केली होती. तसेच विजय राठोड व वैशाली माने यांना अटक करण्याची विनंतीही केली होती.या विनंतीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करुन स्वत: पंचनामा केला.
दरम्यान, घटनास्थळावरुन वैशाली माने फरार झाली. तसेच विजय राठोड यांचा तिसऱ्या दिवशी पीसीआर घेतला. या सर्व प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.