नांदेड : नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडफ येथील प्रतिभा वाठोरे या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत 584 गुण मिळवत आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे. प्रतिभाचे कुटुंब शेतमजुरांचे आहे. तिचे आई - वडील आणि एक भाऊ मोलमजुरी करून चरितार्थ चालवत होते. प्रतिभा लहाणपणापासूनच चुणचुणीत आणि हुशार आहे. तिने आयुष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी वडील विनायक वाठोरे यांनी जीवापाड मेहनत घेतली. मोलमजुरी करून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. मात्र अचानक प्रतिभाच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर अल्पावधीतच तिच्या वडिलांचेही निधन झाले.
आई - वडिलांनंतर भावाचाही मृत्यू : आई - वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ग्रामस्थांनी पोरक्या झालेल्या प्रतिभा आणि तिच्या भावाच्या पाठीशी मदतीची भिंत उभारली. मात्र एक दिवस प्रतिभाच्या भावाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. आधी आई - वडील आणि त्यानंतर भावाच्या मृत्यूनंतरही प्रतिभाने डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडले नाही. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती जिद्दीने पेटली. प्रतिभाची डॉक्टर होण्याची ही जिद्द पाहून कृषी अधिकारी भारत वाठोरे, प्रा. महेंद्र नरवाडे, प्रा. देवराव वाठोरे, शिक्षक राहुल वाठोरे, यशवंत वाठोरे, प्रा. भास्कर दवणे, संजय वाठोरे हे तिच्या पाठीशी उभे राहिले.