नांदेड -गोदावरी नदी पात्रात सकाळपासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ते महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घेऊन, गोवर्धनघाट परिसरात पोहोचले. दरम्यान छापा पडल्याचे लक्षात येताच वाळू तस्कर तराफे जागीच सोडून फरार झाले. गेल्या काही दिवसांपासून गोवर्धन घाट, कौठा, डंकिन, उर्वशी मंदीर या परिसरामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे.
विशेष बाब म्हणजे भर दिवसा वाळू तस्कर वाळूचा उपसा करत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन नदीकाठावरील गोवर्धनघाट गाठला. दरम्यान जिल्ह्याधिकारी आल्याची माहिती मिळताच वाळू तस्कर घटनास्थळावरून फरार झाले.