नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस नांदेड : मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यास तडाखा बसला आहे. मुखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर कंधार तालुक्यात एक म्हैस दगावली, किनवट तालुक्यातील मोहाडा येथील अशोक बापुराव पवार या शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. किनवट तालुक्यात तीन घरांची पडझड झाली आहे. तर हदगाव तालुक्यात सात घरे पडली आहेत. मुदखेड येथे एक घर पडले आहेत. बिलोली तालुक्यात सर्वाधिक ५२ घरांची पडझड झाली आहे. देगलूर तालुक्यातील तीन जनावरे दगावली आहेत. हदगाव तालुक्यात तीन शेळ्या, एक गाय, एका बैलाचा मृत्यू झाला तर भोकर तालुक्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला.
सासरा, सून अन् मुलाची १२ तास पुराशी झुंज :शेतीचे काम आटोपून घरी निघण्याची तयारी, मात्र तोच आभाळ काळोखून आले, समोरच्या नदीचे पाणी झपाट्याने वाढत होते. घरी जाता येणार नाही, असे वाटत असतानाच पुराने आखाड्याला वेढाही घातला. ७५ वर्षांच्या आजोबांसह त्यांच्या मुलगा आणि सुनेने रात्रभर अक्षरश: मृत्यूशी झुंज दिली. अखेर दुपारी तीन वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी तिघांचीही सुखरूप सुटका केली.
पैनगंगा नदीला पूर : माहूर तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. तालुक्यातील टाकळी येथील भागवत रामचंद्र भंडारे (७५), त्यांचा मुलगा रामचंद्र आणि सून
भाग्यश्री हे तिघेही शेतात अडकून पडले. संपूर्ण आखाड्याला पुराचा वेढा पडला अन् जीव मुठीत घेऊन तिघांनीही या परिस्थितीचा सामना केला. डॉ. निरंजन केशवे यांनी तहसीलदारांना फोन लावला; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी पाठविली. ही तुकडी सकाळी ७:३० वाजता माहूर येथे पोहोचली. एसडीआरएफच्या जवानांनी दुपारी तीन वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवून बोटीच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या भंडारे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.
चार दिवस धोक्याचे :दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आणखी चार दिवस मुक्कामी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दुपारी अंदाज वर्तविला आहे. त्यात हा इशारा देण्यात आला. २३ ते २६ जुलै या काळात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी चार दिवस जिल्ह्याला सतर्क रहावे लागणार आहे.
हेही वाचा :
- Painganga River Floods : पैनगंगा नदीला महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, मराठवाडा-विदर्भ रस्ताही बंद
- Monsoon Rain Nanded : नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद; कुठे तलाव फुटला तर कुठे उखडले रस्ते,जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
- Nanded Rain: पुरात अडकलेल्या शाळकरी मुलांची जेसीबीच्या साहाय्याने सुटका, पाहा व्हिडिओ