नांदेड :मुसळधार पावसामुळे असना नदीला पूर आला आहे. गुरुवारीसकाळपासून नांदेडमध्ये सुरू असलेल्या पावसाची शहरात 192 मिमी इतकी नोंद झाली आहे. अर्धापुर तालुकायतील लहान या गावात जिल्हा परिषद शाळेला पूर्ण पाण्याने वेढा घातला आहे. यात शाळेत उभ्या असलेल्या मोटारगाड्या अक्षरशः पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. जिल्ह्यात किनवट तालुक्यातील किनवट ते मांडवी रस्त्यावरील एका नाल्याच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर, मुखेड तालुक्यातील राजुरा बु येथील प्रदीप बोयाळे हा 25 वर्षीय तरुण शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. तेव्हा औराळमध्ये असणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे वाहून गेला. त्याचा मृतदेह 2 किलोमीटर अंतरावर सापडला आहे.
जनजीवन विस्कळीत :जिल्ह्यात पावसामुळे अर्धापुर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव या गावांत आसना नदीचे पूर्ण पाणी शिरले आहे. गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनवट तालुक्यातील सिंगारवाडी व सुंगागुंडा गावालगत असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे दोन्हीही गावांचा संपर्क तुटला आहे. दुधगाव या गावातील घरे पाण्याखाली गेली आहेत. किनवट येथील सुवर्णा धरणाच्या बॅकवॉटरमुळे अप्पाराव पेठच्या काही घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा प्रशासनाशी संपर्क साधून सुवर्णा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील 60 ते 70 घरांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आठवड्यात झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे.
पाणीसाठा वाढण्याची शक्यता :राज्यात तब्बल महिनाभर उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे नांदेडकरांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र आता विष्णुपुरी प्रक्लप सध्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी 352.55 मीटर इतकी वाढली आहे. पाण्याचा साठा 62.80 टक्के भरलेला आहे. पुढील काळात पावसाचा जोर असाच राहिल्यास प्रकल्पात पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत कुणीही अनावश्यक स्थितीत गर्दी करू नये, पुलावरून पाणी जात असेल तर गाडी चालविण्याचे धाडस करू नये. स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल 26 जुलैच्या मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील 1, भोकर तालुक्यातील 1, किनवट तालुक्यातील 5 अशा एकुण 7 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. किनवट येथे प्रशासनाने आवाहन करूनही बेल्लोरी नाला पूलावर वाहत्या पाण्यात पायी जाण्याच्या नादात अशोक पोशट्टी ही व्यक्ती वाहून गेली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील 25 वर्षे वयाचा प्रदिप साहेबराव बोयाळे हा तरुणवाहून गेला. याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
अनेक ठिकाणी पूर: नांदेड जिल्ह्यात सर्वत्र होत असलेला पावसामुळे लहान-मोठे नदीनाले खळखळून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांना पाण्यात न उतरण्याचा, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन त्यातून न चालविण्याचे, पाण्यातून न जाण्याचे आवाहन शासन वेळोवेळी करीत आहे. किनवट येथे बेल्लोरी नाल्यावर एका व्यक्तीने लोकांनी सांगूनही न ऐकता वाहत्या पुलातून पायी गेल्याने तो प्रवाहामुळे वाहून गेला. आपला जीव हा अधिक किंमती आहे. नागरिकांनी अशा स्थितीत संयमाने रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, आरोग्य विभाग, पोलीस विभाग हे परस्पर समन्वय ठेवून आहेत. यात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.