नांदेड - जिल्ह्यात विशेष मोहिमेदरम्यान, कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. यात 11 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात उपविभाग निहाय कोम्बिंग ऑपरेशनची विशेष मोहीम राबविण्यात आली.
158 रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कार्यवाही
यात फरार, पाहिजे, हिस्ट्रीशिटर असलेल्या आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान, जिल्ह्यातील 36 पोलीस स्टेशन हद्दीमधील 158 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
11 आरोपींना ताब्यात घेऊन केली कार्यवाही
या मोहिमेदरम्यान, वेगवेगळ्या पोलीस ठाणेंतर्गत अर्धापूर (1), वजिराबाद (1), सोनखेड (1), नांदेड ग्रामीण (5), लोहा (2), तामसा (1) असे एकूण 11 पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. हे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सतर्कतेने व प्रभावीपणे राबविली आहे.