नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, तरीही काही महाभाग घराबाहेर विनाकारण येत आहेत. म्हणून नांदेड पोलिसांनी अश्या महाभागांना धडा शिकवला आहे. भर दुपारच्या उन्हात त्यांना रस्त्यावर बसवले आहे.
हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडण्याच्या सूचना, आदेश प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात येत आहेत. मात्र, या आदेशाचे पालन सर्वजन करीत असताना, काही टवाळखोर बिनकामी रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरताना पोलिसांना आढळून आले. पोलीसांनी त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. तर भर दुपारच्या उन्हात त्यांना रस्त्यावर बसवून ठेवले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 11 वा दिवस आहे.