महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दागिन्यांसाठी भावानं तोडलं नातं; पोलिसांच्या मदतीनं बहिणीला मिळाले २० तोळे सोनं!

Nanded News : अनेकदा मालमत्ता, पैसा, वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी या कारणांमुळं नात्यामध्ये कटुता निर्माण होते. असंच काहीसं नांदेडमध्ये घडलंय. बहिणीच्या हक्काचं असलेलं सोनं देण्यासाठी भावानं नकार दिला. तसंच या दागिन्यांसाठी त्यानं आपल्या बहिणीसोबत असलेलं नातंदेखील तोडून टाकलं. शेवटी दोन वर्षांनंतर पोलिसांच्या मदतीनं बहिणीला आपल्या हक्काचं सोनं मिळालं आहे.

nanded news with help of police woman got back jewellery belonging to her brother
दागिन्यांसाठी भावानं तोडलं नातं; पोलिसांच्या मदतीनं बहिणीला मिळालं आपल्या हक्काचं सोनं

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 10:31 AM IST

नांदेड Nanded News :नांदेडमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर भावानं बहिणीच्या 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर हक्क दाखवला होता. मात्र, पोलिसांनी भावाला ठाण्यात बोलावून समजावून सांगितल्यानंतर 14 डिसेंबर रोजी भावानं सर्व दागिने बहिणीला परत केले आहेत.

काय आहे प्रकरण :संगीता प्रशांत उत्तरवार या आदिलाबाद येथे राहतात. त्यांच्या ऐश्वर्या, मैथिली ह्या दोन मुली वैद्यकीय शिक्षण घेतात. 2013 मध्ये संगीता यांचे पती प्रशांत यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांनी मुलींच्या भविष्यासाठी म्हणून 20 तोळे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. यामध्ये 3 तोळे लक्ष्मीहार, 12 तोळ्यांच्या पाटल्या, 3 जोडी झुमके, 2 आणि दीड तोळ्यांची प्रत्येकी 1 अंगठी, 2 तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र यांचा समावेश होता. संगीता यांनी हे दागिने वडील मधुकरराव पारसेवार यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वजिराबाद शाखेत लॉकरमध्ये ठेवले होते. एप्रिल 2021 मध्ये मधुकरराव पारसेवार यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर नॉमिनी म्हणून त्यांचा मुलगा दत्ता पारसेवार यांना बँकेच्या लॉकरचा ताबा देण्यात आला.

पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला बहीण भावातील वाद :दत्ता पारसेवारनं लॉकरमधील दागिने बहीण संगीता यांना काढून देण्यास टाळाटाळ सुरू केली. याच कारणावरून भाऊ आणि बहिणीमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळं भावानं आपल्या बहिणीला घरी येण्यास सुद्धा मज्जाव केला. दोन वर्षानंतर बहीण भावामधील हा वाद वजिराबाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. संगीता उत्तरवार यांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर दत्ता पारसेवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी महिलेच्या भावाला समज दिली. तसंच सोनं परत दिलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस निरीक्षकांनी दिला.

  • हक्काचं सोनं मिळालं परत : पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर दत्ता पारसेवार यांनी लगेच बँकेच्या लॉकरमधील 20 तोळे सोनं पोलिसांना आणून दिलं. 14 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संगीता उत्तरवार यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींना ठाण्यात बोलावून सर्व दागिने परत केले. यावेळी संगीता यांचे नातेवाईकही उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. दागिन्यांची बॅग चोरी प्रकरणात ओडिसातून चोरट्याला मुद्देमालासह अटक, नांदेड पोलिसांनी 'अशी' केली दमदार कामगिरी
  2. Nanded Crime News: बोगस टेलिकॉम एक्सचेंजमधून खंडणी मागणारी टोळी गजाआड
  3. Nanded Hospital Death : नांदेड मृत्यू प्रकरण; 20402 पदे भरलीच नाहीत, शासनाची प्रतिज्ञापत्रात धक्कादायक माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details