नांदेड -शहर व जिल्ह्यात वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल टीका होत असताना आज पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने काँग्रेस कार्यकर्ते व माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. नागपूर जिल्ह्यात ही कारवाई झाल्याने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुरुचरणसिंघ उर्फ लकी गिल (३० रा. अबचल नगर नांदेड) आणि सय्यद नजीदउद्दीन सय्यद मुनीरोद्दीन (३४ रा.आसरा नगर नांदेड) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
नांदेड : काँग्रेस माजी नगरसेवक गोल्डनमॅन कोकुलवार यांच्यावर गोळ्या झाडणारे ताब्यात - Nanded Municipal Councilor murder case
नांदेड महापालीकेचे माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाने अटक केली आहे. या पथकाकडून जिल्ह्यातील आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गेल्या १७ ऑगस्ट रोजी गोल्डनमॅन अशी ओळख असणाऱ्या काँग्रेसचे माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर चौफाळा परिसरातील त्यांच्या निवासस्थानालगत गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. एअर अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. साधारणतः एक महिन्याच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत बजरंग नरवाडे (रा.अंबाळा, ता.हदगाव), राजू राऊत (रा. बरडशेवाळा ता. हदगाव), सुभाष पवार (रा. बरडशेवाळा ता. हदगाव) या तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
नांदेड शहरात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावून हल्ला करण्याचे प्रकार वाढल्यानंतर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंघ उर्फ रिंदा याच्या साथीदारांना लक्ष्य केले होते. त्याचे अनेक साथीदार जेरबंद झाले असले तरी कोकुलवार गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरारच होते. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने गुरुचरणसिंघ उर्फ लकी गिल (३० रा. अबचल नगर नांदेड) व सय्यद नजीदउद्दीन सय्यद मुनीरोद्दीन (३४ रा.आसरा नगर नांदेड) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. गिलविरुद्ध विविध ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सय्यद उर्फ गुडडू विरुद्ध भोकर मध्ये आणि इतवारात असे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. कोकुलवार गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार गिल असून तो अटक झाल्यास आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. खंडणीसाठीच हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.