नांदेड - कोरोना उपाययोजनेची कामे युद्ध पातळीवर सुरू असताना, साफसफाई व नालेसफाई करणाऱ्या कामगारांना आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवले नसल्याच्या कारणावरून महापालिकेने कचरा ठेकेदाराला नोटीस पाठविली आहे. २४ तासात साहित्य पुरवठा करावा अन्यथा देयकातून रकमेची कपात केली जाईल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणेने उपाययोजना सुरू केल्या. परंतु, महापालिकेच्या यंत्रणेची गती धीमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्तांचा पदभार असल्याने महापालिका पुन्हा वाऱ्यावर पडली आहे. अशा परिस्थितीत सांगणारे कोणी नाही, आणि करणाऱ्यांचे धाडस नाही, अशी अवस्था झाली आहे. पोलीस, महसूल यंत्रणा व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपाययोजनेची कामे करताना मास्क, हातमोजे व सॅनिटायझर पुरविले जात आहे किंवा ते कर्मचारी स्वतःहून आणून काळजी घेत आहेत. परंतु, दिवसभर शहराची साफसफाई, गटार सफाई, नाले सफाई तसेच अत्यावश्यक सेवेची कामे करणाऱ्या कामगारांकडे असे कोणतेही साहित्य नाही. ज्यांनी हे कामगार पुरवले त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे. ठेकेदाराने ही जबाबदारी पार पाडली नाही तर तपासणी करण्याचे काम महापालिकेचे आहे. परंतु, यात दुर्लक्ष झाल्यामुळे कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.