महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इसापूर धरणातील हक्काचे पाणी इतरत्र जाऊ  देणार नाही - खासदार चिखलीकर - isapur dam water

भोकर मतदारसंघात इसापूर धरणाच्या पाण्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नसून या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचे एक थेंबही पाणी इतरत्र जाऊ देणार नाही.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

By

Published : Aug 23, 2019, 9:57 PM IST

नांदेड - इसापूर धरणातील हक्काच्या पाण्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. भोकर मतदारसंघात इसापूर धरणाच्या पाण्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नसून या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचे एक थेंबही पाणी इतरत्र जाऊ देणार नाही. उलट जे आज संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांच्याच काळात इसापूर धरणाच्या वरील बंधाऱ्याना मान्यता दिली आहे. अशी टीका काँग्रेसच्या नेत्यावर चिखलीकर यांनी केली आहे. भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथील जनता दरबारात ते बोलत होते.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

यावेळी खासदार चिखलीकर पुढे बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे हित जोपासून त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेनी मला भरघोस मतदान केले. मी खासदार नाही तर जनतेचा सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यामुळे जनतेचे हित हेच माझे कर्तव्य आहे. यावेळी त्यांनी जनतेच्या विविध तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच हजेरी घेतली.

प्रारंभी जनतेनी आपल्या तक्रारीचे निवेदन चिखलीकर यांच्याकडे सुपूर्द केले. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि तक्रारकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणली. यातून अनेक समस्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न झाला. तर काही अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले. अशा अधिकाऱ्यांना मात्र खासदार महोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यावेळी अधिकाऱ्यांची मात्र भंबेरी उडाली.

या जनता दरबारात स्थानिक स्तरावरील विकास कामात झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीही आल्या होत्या. या तक्रारीचे उतर देताना अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. तर त्या पाठोपाठ विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी येथील विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द अनेक तक्रारी करून रात्रीच्या वेळी फ्यूज टाका. अशी विनंती करणाऱ्या एका नागरिकांविरूध्द शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तो नागरिक आजही कारागृहात आहे. अशी तक्रार धर्मराज देशमुख यांनी बोलून दाखवली. त्यावर प्रतापराव पाटील चिखलीकर आक्रमक झाले. त्यांनी लगेच विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधून संबंधित विद्युत कर्मचाऱ्यांला निलंबित करण्याचे आदेश दिले.

याशिवाय राज्य रस्ते, जिल्हा ग्रामीण मार्ग, ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, शेतकरी कर्ज प्रकरण, रोहयो, वनविभाग, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, महीला - बाल कल्याण, निराधार अर्थ सहाय्य योजना आदी विभागातील अनेक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबधिताना सुचना देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष प्रविण गायकवाड, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे, जि. प. सदस्य बबनराव बारसे, माजी जि. प. सदस्य धर्मराज देशमुख, माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील कदम, उपसभापती डॉ. लक्ष्मणराव इंगोले, दत्ता पाटील पांगरीकर, उपविभागीय अधिकारी किरण आंबेकर, तहसीलदार सुजित नरहरे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, गटविकास अधिकारी मिना रावताळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पालेपवार, विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नागेश खिल्लारे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, गटशिक्षण अधिकारी गंगाधर राठोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details