नांदेड - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण हे सोमवारी शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल करणार आहेत. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नांदेड मतदारसंघ : अशोक चव्हाण सोमवारी तर चिखलीकर मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज - ashok
एकेकाळचे कट्टर मित्र आणि कट्टर राजकीय विरोधक असणारे 'अशोकराव विरुद्ध प्रतापराव' असा सामना होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी(कवाडे गट), रिपाइं (गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी या पक्षांचे उमेदवार अशोक चव्हाण हे उमेदवारी अर्ज सोमवार दाखल करणार आहेत. यावेळी महाआघाडीची मिरवणूक निघणार असून ही रॅली जुना मोंढा टॉवर - गुरुद्वारा चौक - महावीर चौक वजिराबाद मार्गे मुथ्था चौक - एस. पी. ऑफिस - कलामंदिर - शिवाजी नगर उड्डाण पुल-ज्योती सिनेमागृहच्या मार्गे गोकुळ नगर येथील इंदिरा गांधी मैदान येथे पोहचेल. तेथे सभा होऊन सांगता होणार, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी दिली.
तसेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रा.स.पा. युतीचे अधिकृत उमेदवार आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी जुना मोंढा टॉवर येथून सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे. ही रॅली गुरुद्वारा चौक - महावीर चौक - हनुमान पेठ - कलामंदिर - शिवाजीनगर मार्गे आयटीआय येथे पूर्ण होणार आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ . संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे.