नांदेड Nanded Hospital Death : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील 48 तासांपासून मृत्यूचं तांडव सुरू आहे. पहिल्या दिवशी 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात तब्बल 12 नवजात बालकांचा समावेश होता. त्यानंतर सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. आता आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 35 वर पोहोचली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. धक्कादायक म्हणजे यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे.
अशोक चव्हाणांनी काय केलं ट्विट : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिलय, 'नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी आम्ही त्यांना रुग्णालयातील परिस्थितीबाबत विस्तृत माहिती दिली. रुग्णालयाची आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी अनेक तात्कालिक व दीर्घकालीन उपाय सुचवले. दोन्ही मंत्र्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या असून त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयातील बळींची संख्या ३५ वर गेले आहेत. यात एकूण १६ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय.
16 घरांचा हिरावला आनंद : दरम्यान या रुग्णालयात ज्या १६ नवजात बालकांचा मृत्यू झालाय, त्यातील बहुतांश बालक एक ते चार दिवसांचे होते. या घटनेनं पीडित आई-वडिलांना मोठा धक्का बसलाय. आपल्या नवजात बालकांच्या मृत्यूमुळं त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. बाळाला हसताना पाहण्याचा योग आई वडिलांना मिळाला नाही. यात 16 घरांचा आनंद हिरावला गेला आहे.
औषधी का खरेदी केली नाही, चौकशी करणार :नांदेड इथल्या रुग्णालयात तब्बल 35 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या रुग्णालयात औषधांचा साठा नसल्यानं रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. रुग्णालयानं औषध खरेदी का केली नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे आदेश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.