नांदेड - मराठवाड्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मराठवाड्यात सर्वाधिक ५.३८ इतका मृत्यूदर नांदेड जिल्ह्याचा असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे हैराण झालेल्या मुंबईचा मृत्यूदर ५.६८ असून, नांदेड त्याच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने शेवटचा उपाय म्हणून आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण दुप्पट तर मृत्यू अडीचपटीने वाढले आहेत. जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती. १७ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे. जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता, आता जुलैच्या मध्यापर्यंत हा आकडा ४३ वर पोहचला आहे.
कोरोना अत्यवस्थ रुग्णांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येते. या ठिकाणी या रुग्णांवर उपचार होतो. मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च रक्तदाब , मधूमेह , श्वसनाचा त्रास यासारखे गंभीर आजार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मृत्यू पावणाऱ्यांमध्ये वयोवृद्धासह तरुण आणि अकरा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्ण नांदेडातच उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यूदर.....!
नांदेड- 5.38