नांदेड - 'आम्ही घरी बसून कंटाळलो आहे. आम्हाला शाळेची आठवण येत आहे. लवकरात लवकर शाळा सुरू करा', अशी भावनिक साद घालत येथील एका चिमुकलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील संस्कृती जाधव असे या मुलीचे नाव आहे.
ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आलाय; लवकर शाळा सुरू करा - चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र. - nanded students letter cm thackeray
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा अजूनही बंद आहेत. यामुळे दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड येथील एका विद्यार्थिनीने ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे, लवकरात लवकर शाळा सुरू करा, अशी भावनिक साद घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील शिक्षकाने जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखनाचा उपक्रम घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नातेवाईकांना पत्र लिहिले. मात्र, इयत्ता पाचवी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीने मात्र थेट मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा सुरू करण्याची विनंती केली आहे. शाळेतील शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखनाचा उपक्रम घेतला होता. यावेळी संस्कृती जाधव या चिमुकलीनं हे पत्र लिहिले. त्यात तिने लिहिले आहे, 'आम्हाला घरी बसून कंटाळा आलाय, ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आलाय आहे, घरी बसून शाळेची आठवण येत आहे. त्यामुळे आमच्या शाळेकडून आणि माझ्याकडून आपल्याला विनंती की आमची शाळा लवकरात लवकर सुरू करावी'.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आले होते. यात शाळा अजूनही बंद आहेत. ऑनलाईन शिकवण्या सुरू आहेत. मात्र, हे शिक्षण घेताना विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आहे. संस्कृतीने लिहिलेल्या या पत्रावरून हे दिसून येते. आता या चिमुकलीनं लिहिल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात? अशी चर्चा शिक्षक आणि पालक वर्गात आहे.