नांदेड -खरीप पीकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून हळद, सोयाबीन व कापूस अक्षरश: वाया गेले आहे. आगोदरच अवेळी पडलेल्या पावसाने कशीबशी पेरणी झाली होती. त्यातच आता पीकांचे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी राजा हतबल झाला असून सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
गेल्या चार वर्षापासून अर्धापूर तालुक्यात अत्यल्प पावसामुळे शेतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरीप पीकांचे उत्पादन घटले आहे. यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लष्करी आळी व किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, हळद, कापूस आणि तूर या पीकांवर मोठा परिणाम झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारणी करूनही कीड व अळीचा प्रादुर्भाव कमी व्हायला तयार नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. तसेच आता मोठ्या अर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागणार असल्याचेही शेतकरी म्हणत होते.