नांदेड- जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वतःचे जीवन संपविले आहे. परंतु, अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने ३५ फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात केले.
'वाळूचे कण रगडीता तेलही गळे' ही प्रचंड परिश्रमाची म्हण येथे तंतोतंत खरी ठरल्याचा जणू प्रत्यय येतो. आयुष्यात संघर्ष असल्याशिवाय 'राम' नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी अनेक वर्षे सालगडी म्हणून काम केले आहे. त्यांना ४ मूले आणि ५ मुली आहेत. मेहनत करून त्यांनी पाचही मुलींचे लग्न केले. तसेच ३ मुलांचेही लग्न झाले असून त्यांचा त्यांचा संसार सुखात सुरू आहे.
संसाराचा गाडा चालवत त्यांनी परिश्रमाच्या बळावर दीड एकर जमीन घेतली आहे. त्या जमिनीत पहिल्या वर्षी सोयाबीनची लागवड केली. पण केवळ ६० किलोच उत्पन्न निघाले. त्यामुळे ते प्रचंड निराश झाले. पण जिद्द सोडली नाही. त्यांनी शेतात बोअर घेतला. मात्र, त्याला पाणी कमी असल्यामुळे ते चिंतेत होते.
पाणी टंचाईवर उपाय म्हणून या दांम्पत्याने स्वतःच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे परीसरातील लोक त्यांना वेड्यात काढत होते. लोकांकडे दुर्लक्ष करत दोघांनी विहीर खोदण्याचे काम चालूच ठेवले. १५ फूट पर्यंत स्वतःच विहीर खोदली. पण नंतर क्रेनची मदत त्यांना लागणार होती. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर उपाय शोधत लाकडाचे क्रेन घरीच तयार केले. त्याच्या साहय्याने विहिरीतला कच्चा माल काढला. याकामी त्यांना कधी-कधी एका मुलाची व मुलीचीही मदत झाली. पण या दांम्पत्याने न थकता शेवटपर्यंत काम सुरू ठेवले. विहिरीला पाणीही चांगले लागले. त्यांनी स्वत:हा पस्तीस फुटापर्यंत काम केले आहे.