नांदेड- पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिना पावसाशिवाय गेल्यानंतर जूलै महिन्यात तरी पाऊस पडेल, अशी आशा नागरिकांना होती. पण थेंबाथेंबाने पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. केवळ फवाऱ्याप्रमाणे पडणाऱ्या पावसाने अंगही ओल होत नाही. तेव्हा जमिनीची तहान कशी भागेल आणि तळे केंव्हा भरेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात पाऊस न झाल्यास पाणी-बाणीची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात सिद्धेश्वर धरणातून पाणी मागविण्यात आले . दि. 9 जुलै पर्यंत सिद्धेश्वरमधून १३.५० द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले असून त्यातून विष्णूपुरी प्रकल्पात ३.१० द.ल.घ.मी. पाणी आले आहे . सध्या विष्णुपुरी प्रकल्पात २.५० द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या पाणीसाठा लक्षात घेता जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. नांदेड परिमंडळात १११ प्रकल्प आहेत. दोन मोठे प्रकल्प, १० मध्यम प्रकल्प, तर ८८ लघु प्रकल्पाचा समावेश आहे. पावसाच्या पाण्याने छोट्या-मोठ्या एकाही प्रकल्पात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे चिंतेचे ढग कायम आहेत.
जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली असली तरी पाणीटंचाई कायम आहे. यात माहूर तालुक्यात सात, लोहा पालिकेचे तीन तर नांदेड तालुक्यातील एक टँकर कमी झाले आहे. सध्या जिल्ह्यात १४६ टँकरने एक लाख ९५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भालगतच्या भागात होत असलेल्या पावसामुळे टँकरची संख्या थोडी कमी होत आहे. माहूर तालुक्यात सुरू असलेल्या आठ टँकरपैकी सात टँकर बंद झाले आहेत. तर लोहा नगरपालिकेसाठी सुरु असलेल्या बारा टँकरपैकी तीन, नांदेड तालुक्यातील सोळा पैकी एक टँकर कमी झाले आहे. दरम्यान जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा उजाडूनही अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने जलस्त्रोतांना पाणी आले नाही. यामुळे जिल्ह्यात आजही १४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे .तर 1 हजार १९१ ठिकाणी खासगी विहीरी व कुपनलिकेचे अधिगृहण करुन नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.