नांदेड - जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनातर्फे लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. येत्या काळात सर्वांच्या मनात आनंद पेरणारा दिवाळी व इतर सण असल्याने स्वाभाविकच इतर ठिकाणावरून नातेवाईक येण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत नांदेड जिल्ह्यातील रहिवाशांनी आपल्यासह नातेवाईकांचेही लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिवाळी आरोग्यदायी होण्यासाठी लसीकरण गरजेचे
बाहेरील गावावरुन नांदेडमध्ये व जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नांदेडकरांनी याबद्दल अधिक दक्षता घेतली पाहिजे. ज्यांना नांदेड सोडून बाहेरगावी जायचे आहे त्यांनीही लसीकरण करुनच बाहेर गेले पाहिजे असेही शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दिवाळी आरोग्यदायी होण्यासाठी जर लसीकरण करून घेतले नसेल तर त्यासाठी पुढे येऊन लसीकरण करुन घेणे अधिक हिताचे आहे. याचबरोबर आपल्या नातेवाईकांचे जर लसीकरण झाले नसेल तर त्यांनाही लसीकरण करुन घेण्यास सांगा, असं आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.