नांदेड - आरोपीच्या जामीन सुनावणीत अनुकुल मत सादर करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अडीच वर्ष सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शेख अख्तर मो.हनीफ असे आरोपीचे नाव असून तो सिंदखेड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. प्रथम जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली.
नांदेड जिल्हा न्यायालयाने लाचखोर जमादाराला सुनावली अडीच वर्ष सक्तमजुरी
अंतरिम जामीन मंजूर करायची असेल तर तपास अधिकारी असल्याने माझे मत महत्त्वाचे असल्याचे सहाय्य पोलीस उपनिरिक्षरांनी सांगितले. मात्र, त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून एसीबी पथकाने शेखला रंगेहाथ पकडले होते. तसेच एसीबीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची सुनावणी बुधवारी घेण्यात आली.
माहूर तालुक्यातील सावरखेड येथील प्रवीण किशन महल्ले आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांविरुध्द एका प्रकरणात १२ डिसेंबर २०१३ ला सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख हनीफ करत होते. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता प्रवीण व अन्य आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला. त्यामुळे प्रवीणने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्याठिकाणी त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला होता. त्याची मुदत ११ फेब्रुवारी २०१४ पर्यंत होती. त्यामुळे तो ३१ जानेवारी २०१४ पर्यंत सिंदखेड पोलीस ठाण्यात नियमित हजेरी देऊ लागला. मात्र, एका हजेरीला शेख हनीफची भेट झाली नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी २०१४ ला शेख किनवटला प्रवीणच्या घरी गेला. तसेच २ मार्चला तुम्ही किनवटला या, असे सांगितले.
ठरल्याप्रमाणे प्रवीण आणि त्याचा मित्र शेखकडे गेले. त्यावेळी तुमची अंतरिम जामीन मंजूर करायची असेल तर तपास अधिकारी असल्याने माझे मत महत्त्वाचे असल्याचे शेखने सांगितले. मात्र, त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर प्रवीणने नांदेड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून एसीबी पथकाने शेखला रंगेहाथ पकडले होते. तसेच एसीबीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची सुनावणी बुधवारी घेण्यात आली. यामध्ये आरोपी शेखला अडीच वर्ष सक्त मजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.