नांदेड -वाद घालून एका तरुणास लाथा-बुक्कांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ आरोपींना ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आज नांदेड जिल्हा न्यायालयाचे दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना ३ वर्ष सक्तमजुरी अन् दंडाची शिक्षा
शहरातील हातजोडी चौफाळा येथील माधव कोमटवार यांचा मुलगा विजय हा गल्लीतील मंदिराजवळ २४ फेब्रुवारी २०१३ ला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास फिरण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी शहारुख कलीम पठाण, सलमान खान उर्फ रहिम सलीम खान व शेख सद्दाम शेख मजहर या तिघांनी विजयसोबत वाद घातला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
शहरातील हातजोडी चौफाळा येथील माधव कोमटवार यांचा मुलगा विजय हा गल्लीतील मंदिराजवळ २४ फेब्रुवारी २०१३ ला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास फिरण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी शहारुख कलीम पठाण, सलमान खान उर्फ रहिम सलीम खान व शेख सद्दाम शेख मजहर या तिघांनी विजयसोबत वाद घातला. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली विजयला ठार करतो म्हणून थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सद्दामने लाकडाने डोक्यावर मारले, तर रहिमने कंबर पकडून ठेवली. याप्रकरणी माधव कोमटवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
संबंधित प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोनसकर यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. याप्रकरणी न्यायालयाने १५ साक्षीदार तपासले. सबळ पुरावा ग्राह्य धरून दुसरे अतिरिक्त न्यायाधिश के. एन. गौतम यांनी तिन्ही आरोपींना ३ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अॅड. एस.ए.बत्तुला (डांगे) यांनी सांभाळली.