नांदेड- राज्याच्या काही भागात पावसाचे थैमान सुरु आहे. असे असले तरी नांदेड जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण ८० टक्के भरल्याने या धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात १ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी मोसमात अधूनमधून लावलेली पावसाची हजेरी वगळली तर नांदेडकरांना आतुरतेने पावसाची वाट पाहावी लागली. जवळपास ४० दिवसानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ४ ते ६ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. तर अन्य तालुक्यातही पावसाने दिलासा दिला होता. ऑगस्टच्या पहिल्या ८ दिवसात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यानंतर मात्र ४ दिवस झाले पावसाचा पत्ता नाही. गत २ दिवसांपासून तर उन्हाळयासारखे ऊन पडत आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यात झालेला एकूण पाऊस
नांदेड - ४६ टक्के, मुदखेड - ५९ टक्के,
अर्धापूर - ४५ टक्के, भोकर - ४८ टक्के,
उमरी ४४ टक्के, कंधार - ५१ टक्के,
लोहा - ४४ टक्के, किनवट - ५१ टक्के,
माहूर - ५० टक्के, हदगाव - ४६ टक्के,
हिमायतनगर - ५३ टक्के, देगलूर - ३२ टक्के,
बिलोली - ५१ टक्के, धर्माबाद - ४८ टक्के,
नायगाव - ४८ टक्के , मुखेड - ४४ टक्के