नांदेड - कोरोना संकट काळात जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे, १८ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या बैलपोळ्याला काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. घरगुती पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा प्रशासनाने ११ ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे धार्मिक स्थळावर पूजा करण्यास बंदी घालण्यात आली असून धार्मिक कार्यक्रम, परिषदा यावरही बंदी घालण्यात आली आहे. तर ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोजी पोळा सण साजरा करण्यात येणार असून सदर सण हा ग्राम पातळीवर अत्यंत व्यापक स्वरूपात साजरा केला जातो.