नांदेड जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशाच्या खाली; एक हजार ५६२ गावांचा समावेश
जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२० -२०२१ या वर्षाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा समावेश आहे. आता दि. १५ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल
नांदेड - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२० -२०२१ या वर्षाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा समावेश आहे. यापूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैशावर जाहीर झाली होती. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पीक पाहणी प्रयोगाच्या आधारावर आणेवारी होते जाहीर..!
जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप हंगामाची पैसेवारी कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेकडून करण्यात आलेल्या पीक पाहणी प्रयोगाच्या आधारावर जाहीर करते. यात दि. ३० सप्टेंबर रोजी नजर अंदाज हंगामी पैसेवारी, दि. ३० ऑक्टोंबर रोजी सुधारित पैसेवारी तर दि. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते.
सात लाख ८२ हजार हेक्टरवर झाली होती खरीप पेरणी-
या पैसेवारीच्या निकषावर जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचा तसेच उत्पादनाचा अंदाज गृहीत धरला जातो. जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेवर झाल्या. परंतु पेरणीनंतर पावसाने ओढ दिली. यामुळे सोयाबीनची दोन-तीन वेळा पेरणी करावी लागली. यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास पाच लाख ६४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांसह बागायती व फळपिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या बाबत प्रशासनाने ३८५ कोटींची भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. दरम्यान, या नंतर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाच्या पैसेवारीकडे लक्ष लागले होते. जिल्ह्यात एक हजार ५६२ महसुली गावात सात लाख ८२ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.
15 डिसेंबर नंतर होईल चित्र स्पष्ट-
या सर्वच गावातील सुधारित पैसेवारी पन्नास पैशाचा खाली जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता दि. १५ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारी नंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल