महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Police : हातावेगळा झालेला पंजा पोलिसांच्या विनंतीनंतर डॉक्टरांनी जोडला; आरोपींची काढली धिंड - nanded crime news

नांदेड पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या घटनेत त्यांनी तलवारीच्या हल्ल्यात हातापासून वेगळे झालेले एका मजुराचे मनगट डॉक्टरांनी विनंती करून जोडून घेतले. त्यामुळे आयुष्यभर दिव्यांग राहण्याची परिस्थिती मजुरावर ओढावू शकली नाही. यानंतर पोलिसांनी 3 हल्लेखोरांना अटक करून त्यांची धिंड काढली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Nanded Police Promptness
आरोपींची काढली धिंड

By

Published : Jul 23, 2023, 8:07 PM IST

मजुराचा पंजा तोडणाऱ्या आरोपींना केलेल्या अटकेविषयी पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

नांदेड:शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून तिघांनी एका मजुरावर हल्ला करून मनगटापासून त्याचा पंजा वेगळा केला होता. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु सोबत कोणीही नातेवाईक नव्हते. अशावेळी हातापासून वेगळे झालेले मनगट जोडता येते का, याची चौकशी पोलिसांनी केली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला विनंती केली. त्या मजुरावर तब्बल 8 तास यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आयुष्यभर दिव्यांग राहण्याची वेळ आलेल्या त्या मजुराला आपला हात पुन्हा मिळाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पोलिस अधीक्षकांनी निधी गोळा करून मजुरांच्या खासगी रुग्णालयाचे बिलसुद्धा भरले.

वाद आणि तलवारीने हल्ला:२० जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता त्रिशरण कैलास थोरात हा चिखली खुर्द परिसरातील तरोडा नाका रस्त्यावर उभा होता. त्या ठिकाणी सूरज संजय बसवते (रा. पांडुरंगनगर), विजय राम जाधव (रा. नमस्कार चौक) आणि आकाश रणमले असे तिघे जण आले. यावेळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर थोरात यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात थोरात यांच्या हाताचा पंजा मनगटापासून वेगळा झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर पडला होता. ही बाब अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि पोनि बोलमवाड यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. थोरातला शासकीय वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. सोबत एका बॅगमध्ये तुटलेला हाताचा पंजाही होता; परंतु शासकीय रुग्णालयात प्लास्टिक सर्जन नसल्याने थोरातवर शस्त्रक्रिया होणे शक्य नव्हते. दुसरीकडे रुग्णालय थोरातला डिस्चार्जही देत नव्हते.

त्याच्यासाठी पोलीस अधीक्षक आले धावून:जखमी त्रिशरण थोरात यांची स्थिती गंभीर असल्याचे जाणून लगेच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे रुग्णालयात धावून गेले. त्यांनी रुग्णाची जबाबदारी स्वतःवर घेत डिस्चार्ज करून घेतला आणि दुसऱ्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊ शकते का, याची चौकशी सुरू केली. त्यातच डॉ. पालीवाल यांनी शस्त्रक्रिया करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर डॉक्टरांनी आठ तास थोरातांवर शस्त्रक्रिया करून त्याचा तुटलेला पंजा पुन्हा मनगटाला जोडला. आता या पंजाची हालचालही होत आहे. पोलिसांच्या तत्परतेने थोरातला गमावलेला आपला हात परत मिळाला आहे.

गुन्हेगारांची काढली धिंड:गुन्हेगारांमध्ये वचक राहावा या उद्देशाने भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी आज तिन्ही आरोपींची शहरातून धिंड काढली. भाग्यनगर पोलीस ठाणे ते जंगमवाडी आणि परत ठाण्यापर्यंत ही धिंड काढण्यात आली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, नांदेडमध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदाच आरोपींची धिंड काढण्यात आली. या प्रकारामुळे नक्कीच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. याही पुढे अशाच प्रकारे कारवाई केल्यास गुन्हेगारांची हिम्मत बळवणार नाही, असे नागरिकांमधून सांगितले जात आहे.

हेही वाचा:

  1. Threat Call To Mumbai Police : मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने...
  2. Temple Robbery : मत्स्योदरी मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना 24 तासाच्या आत अटक
  3. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर

ABOUT THE AUTHOR

...view details