नांदेड Nanded Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. हुंड्यातील राहिलेली रक्कम आणि गृहोपयोगी साहित्य माहेरहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. त्यानंतर, अंगावर चटके देऊन मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. सबा बेगम शेख असलम असं मृत महिलेचं नाव असून ही घटना ४ ऑक्टोबर रोजी इस्लामपुरा भागात घडली. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चटके देऊन केली हत्या केल्याचा आरोप : मिळालेल्या माहितीनुसार मृत सबा बेगम ( वय २३) चा विवाह शेख असलम याच्यासोबत २०२२ मध्ये झाला. विवाहात मुलीच्या कुटुंबियांनी ८० हजारापैकी ३० हजार रुपये हुंडा दिला. त्यानंतर दोन महिने दोघांचा संसार चांगल्या प्रकारे सुरु होता, मात्र त्यानंतर पती सह सासरच्या मंडळींनी हुंड्यातील राहिलेल्या रक्कमेसाठी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तू काळी आहे, दिसायला चांगली नाहीस, उंची पण कमी आहे, असे म्हणत तिला मारहाण करण्यात येत असल्याचा आरोपीह नातेवाईकांनी केला. एवढचं नाही तर दोन दिवसांपूर्वी तिला चटके दिले. त्यानंतर तिच्या फोन करुन तुमची मुलगी बेशुद्ध होऊन मरण पावली, अशी माहिती दिल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
गुन्हा दाखल :दरम्यान, मृत विवाहितेचे वडील शेख महेबूब अब्दुल रहीम यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात शेख असलम (पती), मन्नी बेगम उर्फ सायरा बानू (सासू), शेख हमीद (सासरा), शेख अश्फाक (दिर), नसीमा बेगम आणि शेख जलाल शेख करीम यांच्या विरोधात कलम ३०२, ३०४ (ब ), ४९८ (अ), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.