नांदेड - जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोड्या, चार मोटारसायकलच्या चोऱ्या, एक मोबाईल चोरी आणि एक भुलथापा देवून झालेली चोरी अशा ११ घटनांमध्ये एकूण ६ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
सेंटर पॉईंट इमाइत परिसरात १ लाख ६० हजार लंपास
नांदेडच्या सेंटर पॉईंट इमारतीत असणाऱ्या आयुष दवाखान्यामध्ये दि.१५ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता आपले शटर बंद करून डॉ. राजेश चंद्रकांत पंडीत घरी गेले. १६ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या शटरचे कुलूप तोडलेले होते. आदल्या दिवशी दवाखान्यात सेवा देवून आलेली फिस काऊंटरमध्ये ठेवलेली होती. ती १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सावंत हे तपास करत आहेत.
मुखेड तालुक्यात २ लाख ३६ हजाराचा ऐवज लंपास
मौजे हाळणी ता. मुखेड येथील सुशिलाबाई हुलप्पा उमाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १६ डिसेंबर रोजी रात्री १० ते १७ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेदरम्यान त्यांच्या घरातील २ लाख ३६ हजारांचा ऐवज, यादवराव नरसिंग पाटील यांच्या घरातील १५ हजार रुपयांचा ऐवज, सुभाष दासू राठोड यांच्या घरातील १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ६५ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिणे असा तीन जणांच्या घरातून ३ लाख २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या तीन वेगवेगळ्या चोऱ्या एकाच दिवशी सलग घडल्या असल्याने मुक्रामाबाद पोलिसांनी एकच गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गड्डीमे हे करत आहेत.
मोटारसायकल चोरीला
शहरातील लक्ष्मीनारायण नगर, मुदखेडमधील शारदानगर, सुनेगाव ता. लोहा येथे आणि गोंडजेवली ता. किनवट येथून चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. बाजीराव बालाजी माटे यांची दुचाकी गाडी एम.एच.२६ बी.एन.६९६६ ही ४ डिसेंबर रोजी रात्री ९च्या सुमारास चोरीला गेली. विमानतळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार खंदारे अधिक तपास करत आहेत. शारदानगर मुदखेड येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ११ च्यादरम्यान वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उत्तम नरसींगराव गुरूवाड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ ए.जी. ४२४७ चोरीला गेली. मुदखेड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस नाईक मुंडे हे करत आहेत. मौजे सुनेगाव येथून दि. ८ डिसेंबर रोजी ११ वाजता सय्यद इब्राहीम अमीन साब यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ ए.जी. ३३८८ही दुचाकी चोरीला गेली. लोहा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करत आहेत. कोंडजेवली ता. किनवट येथून १५ डिसेंबरच्या आणि १६ डिसेंबरच्या रात्री उठल शामराव राठोड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ ए.एन.९७८० ही दुचाकी गाडी चोरीला गेली. या दुचाकी चोरीचा गुन्हा ईस्लापूर पोलिसांनी दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार लुंगारे हे करत आहेत. या चोरीला गेलेल्या चार दुचाकी गाड्यांची किंमत १ लाख २५ हजार रुपये अशी आहे.
मोबाईल लंपास
द्वारका रामचंद्र कळवे (५०) या अंगणवाडी सेविका १६ डिसेंबर रोजी हिंगोली गेट येथून चिखलवाडी कॉर्नरकडे पायी येत असतांना मोबाईलवर बोलत होत्या. तेंव्हा त्यांच्या हातातील ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. वजिराबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक जावेद अधिक तपास करत आहेत.
भूलथापा देऊन सोन्या-चांदीची चोरी
भिकराबाई गोपीचंद आडे रा. सोमठाणा तांडा ता.भोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.४० च्या सुमारास रामदेव बाबा कलेक्शन दुकानाच्या पाठीमागे कांही जणांनी त्यांना भुलथापा देवून त्यांच्या जवळील १५ तोळे वजनाचे चांदीचे दंडकडे, दोन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दोन झुमके, दोन ग्रॅमचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र आणि रोख २ हजार रुपये असा २९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत भोकर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार राठोड अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -अश्विन, उमेश यादवच्या गोलंदाजीने 'कांगारू' गारद; भारताकडे ६२ धावांची आघाडी