नांदेड- देगलूर- बिलोलीचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर ( MLA Marriage, Jitesh Antapurkar ) आज प्रतिक्षा यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहास जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने वधु- वरास आशिर्वाद देण्यासाठी उपस्थितीत होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी ( Assembly Speaker ) विशेष अधिवेशन आजच बोलावण्यात आले होते.
शिंदे-फडणवीस गटासोबतच महाविकास आघाडीसाठी देखील ही निवडणूक मोठी होती. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी प्रत्येक मत महत्वाचे होते. परंतु, काँग्रेस जितेश अंतापूरकर यांनी मात्र आधी लगीन, अशी भूमिका घेत विधानसभा अधिवेशनाला दांडी मारत लग्न उरकून घेतले आहे. अर्थात त्यांना पक्षश्रेष्ठींनी तशी परवानगी दिली होती.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीचे राजन सावळवी विरुद्ध शिंदे- फडणवीस गटाचे राहूल नार्वेकर अशी लढत झाली. राहूल नार्वेकर हे १६४ विरुद्ध १०७ मतांनी विजयी झाले आहेत. इकडे विधानसभा अध्यक्षांनी पदभार घेतला, तर तिकडे आमदार अंतापूरकर हे प्रतिक्षा यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आहेत.
दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत जितेश हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जितेश यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. तर भाजपने सुभाष साबणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. परंतु, सहानुभूतीची लाट आणि स्व. रावसाहेब अंतापूरकर यांनी मतदारसंघात केलेली कामे याची पावती म्हणून देगलूर- बिलोलीकरांनी जितेश यांना वडिलांपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून दिले होते. आमदार झाल्यानंतर वर्षभरातच जितेश विवाहबद्ध झाले आहेत.
हेही वाचा -Vidhan Sabha Floor Test : फ्लोअर टेस्टवेळी सर्व आमदारांना सावधगिरी बाळगण्याचे शिंदे-फडणवीस यांचे निर्देश