नांदेड - दोन महिन्यांपूवी राजकीय सतानाट्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. याकाळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत म्हणून कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी आठ हजार आणि बागायतीसाठी 16 हजार रुपये अशी मदत जाहीर केली होती. याचे सर्व पैसे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्याच्या बँकांना देण्यात आले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देखील 387 कोटी 7 लाख 63 हजार 664 रुपये आले. बँकेकडे सध्या पुरेशी यंत्रणा नसतानादेखील रोज दहा कोटींचे वाटप सुरू आहे. अजूनही मदत वाटपाचे गुऱ्हाळ चालूच आहे.
हेही वाचा - बँकिग क्षेत्रातील मोठा निर्णय; रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणार सहकारी बँकांचे नियमन
निवडणुकीनंतर भाजप-सेनेकडून सत्ता स्थापन होत नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले. मात्र, तीन दिवसांत नवे सरकार कोसळले. दरम्यान, शेतकऱ्यांची अबाळ होऊ नये म्हणून राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत जाहीर केली. त्यासाठी महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. त्याच याद्या जिल्हा मध्यवर्ती बैंककडे देऊन मदत वाटप सुरू झाले. जिल्हयातील 5 लाख 34 हजार 889 शेतकन्यांना वाटपासाठी 387 कोटी 7 लाख 63 हजार 664 रुपये आले आहेत. परंतु, जिल्हा बँकेकडे आलेल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्यांमधील बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.