नांदेड -केरळ राज्यातील जिल्हा न्यायधीशाला ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आरोपीला नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा आरोपी नांदेड शहरातील कल्याणनगरचा रहिवासी असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला केरळ सायबर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हॅककरून एक लाखापेक्षा जास्त रक्कम केली होती लंपास -
नांदेड शहरातील कल्याणनगर येथील १९ वर्षीय ओंकार चातरवाड व त्याच्या साथीदारांनी १२ ऑक्टोबर २०२०ला केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्याचे न्यायाधीश के. पी. जॉन पिन्सीपल यांचे नेटबँकींगचे डिटेल्स, युजर आयडी व पासवर्ड हॅक करून १ लाख २ हजार ६९१ रूपयाची ऑनलाइन खरेदी केली होती. ऑनलाइन खरेदी कॅन्सल अप्लीकेशनचा वापर करून ही १ लाख २ हजार ६९१ रूपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर काढून घेतली होती.
आरोपी विरूद्ध केरळमध्ये गुन्हा दाखल -
याप्रकरणी ५ फेब्रुवारीला केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यातील मंजेरी पोलीस ठाण्यात ओंकार संजय चातरवाड (रा . कल्याणगर, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळच्या सायबर फॉरेन्सीक टीमने नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी संपर्क केला. या आरोपीचा शोध घेण्यासाठी शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमले. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. डी. भारती व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
आरोपीला शिताफीने घेतले ताब्यात -
हे पथक आरोपी ओंकार चातरवाड याचा शोध घेत असताना, त्यांना आरोपीचे घर कल्याणनगर येथे असल्याची माहिती मिळाली. तो दररोज रात्री बारा वाजल्यानंतर घरी येतो व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर निघून जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीच्या घराच्या बाजूला अंधारात दबा धरून बसले. ६ फेब्रुवारीला आरोपी रात्री १२ वाजता घरी आला असता पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले.