नांदेड -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली एअर इंडियाची विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला नांदेड-अमृतसर अशी सेवा सुरू केली होती. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार आता तिचा विस्तार करीत पुढे दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. ही सेवा १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून नोंदणी सुरू झाल्याची माहिती येथील स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुठे यांनी दिली.
कोरोनामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती-
कोरोनापूर्वी नांदेड-अमृतसर, नांदेड दिल्ली आणि नांदेड - चंदीगड अशी एअर इंडियाची सेवा सुरू होती. कोरोनामुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात या तिन्ही सेवा बंद होत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू केली.
त्यानुसार एअर इंडियानेही नांदेड-अमृतसर सेवा पुन्हा सुरू केली होती. ती आठवड्यातून तीन दिवस नियमित सुरू होती. या सेवेचा विस्तार करून ती दिल्लीपर्यंत सुरू केली आहे. त्यामुळे नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शीख भाविकांसह अन्य प्रवाशांची सोय झाली आहे.