महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची माणुसकी; मतिमंद महिलेला मिळवून दिला निवारा

राजस्थानमधील उदयपूर येथील सबरुन निसाबेगम असे या ५५ वर्षीय महिलेचे नाव असून नायगाव येथील कॅम्पमध्ये व नंतर आता समाज कल्याणच्या वसतिगृहात तिला निवारा व भोजनाची सोय करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रशासनातील माणुसकी; वाट  मतिमंद महिलेला मिळवून दिला निवारा.....
लॉकडाऊनमध्ये प्रशासनातील माणुसकी; वाट मतिमंद महिलेला मिळवून दिला निवारा.....

By

Published : Apr 11, 2020, 4:37 PM IST

नांदेड - जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकतेमुळे एका परप्रांतीय मतिमंद असलेल्या महिलेला हक्काचा निवारा मिळाला आहे. नुसता निवाराच नव्हे तर लॉकडाऊननंतर तिला तिचे हक्काचे घर मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोना साथ रोगाच्या नियंत्रणासाठी जागोजागी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाचे रस्ते पोलिसांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नजरेखाली आहेत.

तणाव व सततची धावपळ चालू असलेल्या या लॉकडाऊनच्या धामधूमीत नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील कुंटूर ते नायगाव या मार्गावर एक महिला अनवाणी फिरत असल्याचे कुंटूर पोलीस स्थानकाचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले व ही बाब वरिष्ठ स्तरावर कळवण्यासाठी नांदेड येथे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांना कळविले.

देशपांडे यांनी कसलाही विलंब न करता ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय कोणीही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात उपाशी व निवाऱ्या व्यतिरिक्त राहता कामा नये असे तळमळीने काम करणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन व त्यांच्या टीम करीत आहे. त्याचा प्रत्यय येथेही या महिलेच्या निवारा आणि खाण्याची सोय केल्याने आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मीडिया सेलचे डॉ.दीपक शिंदे यांनी तातडीने लक्ष घातले. यानंतर नांदेड यांच्याशी संपर्क केला आणि नायगाव न. पा चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना या महिलेची काळजी घेण्याच्यासंदर्भात सूचना दिल्या.

राजस्थानमधील उदयपूर येथील सबरुन निसाबेगम असे या ५५ वर्षीय महिलेचे नाव असून नायगाव येथील कॅम्पमध्ये व नंतर आता समाज कल्याणच्या वसतीगृहात तिला निवारा व भोजनाची सोय करण्यात आली आहे. नायगावचे पत्रकार चाऊस व वसतीगृहाचे चव्हाण हे तिच्या भोजन व इतर सुविधाची काळजी घेत आहेत. ही महिला चुकून नांदेड येथे आलेली आहे. उदयपूर येथील ही महिला अजमेर येथे दर्शन घेण्यासाठी गेली होती तेथे चुकून ती नांदेडला येणाऱ्या रेल्वेत बसली आणि सरळ नांदेड येथे आली.

नांदेड येथून नायगाव पर्यंत कशी पोहचली हे तिला सांगता येत नाही. परंतु तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या व ओळख पत्राच्या आधारावर तिची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले. अधिकाऱ्यांकडून या महिलेच्या नातेवाईकाकडे संपर्क केला जात असून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.जिल्ह्यामध्ये असलेल्या इतर जिल्ह्यातील मजूर, कामगार तसेच नागरीक यांना निवारा, निवास व अन्न यांची सोय करण्याचा जिल्हा प्रशासन कसोसीने प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांची मदत घेतली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात या महिलेला निवारा तर मिळाला आहे. परंतु नंतर तिला तिचे घर पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details