नांदेड - शहरातील विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरु आहे. २ सांडांच्या टक्करीत एक वृध्द ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरातील मोकाट सांड व जनावरांचा बंदोबस्त मनपाने करावा, अशी मागणी होत आहे.
नांदेड शहरातील मोकाट सांडांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नांदेड शहरात सध्या मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे पालिकने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरुच असून मनपा यंत्रणेने याकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार घडत आहे. यापूर्वीही
हनुमान पेठ वजिराबाद भागात डॉ. बजाज हॉस्पिटलसमोर मोकाट सांडाने एका वृध्दाला उचलून जमिनीवर आपटले होते. या घटनेत हा वृध्द गंभीर जखमी होऊन दोन महिने अंथरुणाला खिळून होते. शहरातील भगतसिंग मार्गावर १८ जूनला सायंकाळी देखील दोन सांड एकमेकांना भिडले आणि शेरसिंग फौजी यांच्या घरासमोरील रस्त्यावर आल्याने अनेक वाहनधारकांची अडचण झाली होती. काहींनी टकरीपासून वाचण्यासाठी दुचाकीचे अचानक दोन्ही ब्रेक दाबल्याने ते खाली पडून किरकोळ जखमी झाले होते. गुरुद्वारा, भगतसिंग मार्ग, जुना मोंढा, वजिराबाद, सुभाष मार्ग भागात मोकाट सांड रस्त्याने फिरताना अनेकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे.
त्यातही वयोवृध्द व बच्चे कंपनीला त्यांच्यापासून मोठा धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनपा यंत्रणेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. विशेषतः शाळा भरताना वा सुटताना या मोकाट जनावरांमुळे दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.