नांदेड जिल्ह्यात 28 ठिकाणी तुरीचे हमीभाव केंद्र सुरू होणार - MSP
सध्या तूर काढणी सुरू असल्याने शासनाचे हमी खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असते. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, महाएफपीसी व विदर्भ फेडरेशनकडून सोयाबीन प्रमाणेच २९ केंद्र तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमीभावानुसार दर मिळावा, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ फेडरेशन तसेच शेतकरी उत्पादक कंपनीकडून जिल्ह्यात २८ ठिकाणी हमीभावानुसार खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.
२८ डिसेंबर पासून नोंदणी प्रक्रीया सुरू
या केंद्रावर शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सोमवार (दि. २८) पासून सुरू झाली. परंतु खरेदी तारखेबाबत स्पष्टता नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारने किमान हमी दरानुसार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनकडून नऊ, महाएफपीसीकडून १७ तर विदर्भ फेडरेशनकडून तीन अशा २९ खरेदी केंद्रांना नाफेडकडून मान्यता मिळाली होती. परंतु यंदा सोयाबीनला खुल्या बाजारात भाव अधिक मिळत असल्याने हमी दरानुसार केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. एकाही खरेदी केंद्रावर सोयाबीन, उडीद व मुगाची खरेदी झाली नाही. यानंतर तूर तसेच हरभरा खरेदी होणार आहे.
सध्या तूर काढणी सुरू
सध्या तूर काढणी सुरू असल्याने शासनाचे हमी खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असते. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, महाएफपीसी व विदर्भ फेडरेशनकडून सोयाबीन प्रमाणेच २९ केंद्र तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसात खरेदी सुरू होईल...!
सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटीव्ह फेडरेशनकडून सध्या तूर उत्पादकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तर महाएफपीसीकडून पुढील काही दिवसात नोंदणी सुरु होइल, असे कळविले आहे. दरम्यान नोंदणीनंतर खरेदी केंद्र सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.