महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता मुंबई ते नांदेड प्रवास सुकर, खासदार चिखलीकरांच्या राज्यराणी एक्सप्रेसचा हस्ते शुभारंभ

मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार होऊन ती दररोज नांदेड-मनमाड-मुंबई तसेच परतीच्या प्रवासात मुंबई-मनमाड-नांदेड अशी धावणार आहे. या रेल्वेचा शुभारंभ शुक्रवारी खासदार चिखलीकर यांच्या हस्ते झाला.

mumbai to nanded rajyarani express
खासदार चिखलीकरांच्या राज्यराणी एक्सप्रेसचा हस्ते शुभारंभ

By

Published : Jan 11, 2020, 11:16 AM IST

Updated : Jan 11, 2020, 12:21 PM IST

नांदेड -पहिल्या अधिवेशनात नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी ५ हजार १५२ कोटींची तरतूद आणि दुसऱ्या अधिवेशनात मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याची मागणी मंजूर करून पूर्ण केली. आता तिसऱ्या अधिवेशनात तिरुपती-निझामाबाद रायलसीमा एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याची मागणी मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेसच्या शुभारंभाप्रसंगी दिली.

खासदार चिखलीकरांच्या राज्यराणी एक्सप्रेसचा हस्ते शुभारंभ

मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार होऊन ती दररोज नांदेड-मनमाड-मुंबई तसेच परतीच्या प्रवासात मुंबई-मनमाड नांदेड अशी धावणार आहे. या रेल्वेचा शुभारंभ शुक्रवारी खासदार चिखलीकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले की, ही रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यात अनेकांनी पाठपुरावा केला. पत्रकारांचेही उल्लेखनीय योगदान आहे. मात्र, मागणी मान्य करून रेल्वे सुरू करण्याचे भाग्य मात्र भाजपचा खासदार असल्यामुळे मला मिळाले. नांदेड लोकसभेतून जनतेने निवडून दिल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात नांदेड-देगलूर-बिदर रेल्वेमार्गासाठी ५ हजार १५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मराठवाड्याच्या आजवरच्या इतिहासात एकाच टप्प्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या अधिवेशनात मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत नेऊन नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मुंबईला जाणारी नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी त्यास तत्काळ होकार देऊन वचनाची पूर्तता केली. तिसऱ्या अधिवेशनात तिरुपती-निझामाबाद-तिरुपती ही दररोज घावणारी रायलसीमा एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

भोकर, धर्माबाद, उमरी, मुदखेड अशा ठिकाणी रेल्वेच्या पुलांची मागणी आहे. राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी या पुलाची उभारणी करण्यासाठी सांगितल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचले. राज्याने ५० टक्के वाटा उचलल्यास केंद्र सरकार देखील ५० टक्के वाटा उचलून जिल्ह्यातील सर्व रेल्वेपुलांची कामे पूर्ण करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चांगल्या कामासाठी आपण सर्वांसोबत राहून विकासाची संकल्पना पूर्ण करू असेही त्यांनी सांगितले. आमचा पक्ष प्रोटोकॉल पाळणारा आहे. रेल्वे विभागानेही त्यांचा प्रोटोकॉल पाळला. जे आले त्यांचा सन्मान करू. काही लोक आले नाही त्यांच्या शुभेच्छा समजून स्वागत करू. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही म्हणून माईकचा ताबा सोडू वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता चिमटा काढला.

राम पाटील रातोळीकर यांनी आपल्या भाषणात या रेल्वेसाठी आमदार झाल्यानंतर आपण प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे रातोळीकर यांच्यासहित सर्वांचे आभार, अशा बोचऱ्या शैलीत त्यांनी टोला लगावला. मनमाड आणि नाशिककरांचा योग्य सन्मान करून त्यांच्या जागा आरक्षणात कोणतीही कपात न करता राज्यराणी एक्सप्रेसला नवीन वाढीव डबे जोडण्यात आले आहेत. सध्याची संख्या कमी असली तरी आणखी ३ डबे जोडण्यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांकडे मागणी करू, असे त्यांनी सांगितले. विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंग यांनी प्रास्ताविक केले. वाणिज्य अधिकारी यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रात्री दहा वाजता हिरवा झेंडा दाखवून नांदेड-मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस सोडण्यात आली.

याप्रसंगी आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अविनाश घाटे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंघ, रेल्वे परिषदेचे सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, जि. प. सदस्य प्रणिता देवरे, माणिक लोहगावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शहराध्यक्ष प्रवीण साले, विरोधीपक्षनेता दीपकसिंह रावत, गणेश सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Last Updated : Jan 11, 2020, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details