नांदेड - अशोक चव्हाण यांनी विकास कामाच्या नावावर मतदान मागायला पाहिजे. इतक्या वर्षात विकास का केला नाही. त्यामुळे दुसऱ्यावर टीका करून मतदान मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे. पैशांच्या जोरावर मतदान मागतील, पण धनशक्तीकडे नाही तर जनशक्तीला मतदान करावे. स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाच बहुमताने निवडून द्यावे असे, आवाहन खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी केले आहे.
हेही वाचा -....खरे तर आरामाची गरज भाजपच्या उमेदवारालाच - अशोक चव्हाण
येळेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. चिखलीकर पुढे बोलताना म्हणाले की, येळेगावला एक कोटी ६५ लाख रुपयांची योजना आम्ही मंजूर केली. अशोकराव चव्हाण म्हणतात की, भोकर मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या योजना आम्ही मंजूर केल्या. पण, त्यांची सत्ता असताना कोणी त्यांचे हात बांधले होते का? निव्वळ खोट बोलून राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील खोटारडेपणाचा पुरस्कार त्यांना द्यावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.