नांदेड- खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या गाडीचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. नांदेडहून लोहाकडे आज (सोमवार) दुपारी चिखलीकर जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या दिशेने एक भरधाव ट्रक आला. चिखलीकर यांच्या चालकांने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला उतरवली त्यामुळे अपघातातून बचाव झाला. अन्यथा भीषण अपघात घडला असता, यात केवळ दैव बलवत्तर म्हणून चिखलीकर सुखरूप बचावले आहेत.
अपघातातून बचावले खासदार चिखलीकर - अपघातातून बचावले खासदार चिखलीकर
खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या गाडीचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे.
वाडी पाटीजवळ लोह्याकडून येणारा एक भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. हा ट्रक खासदार असलेल्या गाडीवर येऊन धडकणार होता, हे क्षणार्धात लक्षात घेऊन खासदाराच्या चालकाने आपली गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे खासदाराची गाडी थोडक्यात बचावली, अन्यथा मोठा अपघात घडला असता. हा क्षण असा होता की गाडीत असणाऱ्या खासदार चिखलीकर आणि माधव पावडे यांना बराच काळ काही सुचलेच नाही. आपण बचावल्या गेलो याचेच समाधान त्यांना होते.
दरम्यान, भरधाव आणि विरुद्ध दिशेने आलेल्या त्या ट्रकचा चालक नशेत असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्या ट्रक चालकासह ट्रकला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेमका ट्रक चालकाच्या नशेतून घडला की त्या मागे अन्य काही कट कारस्थान आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी चिखलीकर समर्थकांनी केली आहे.