नांदेड: फुलाबाई चिनकीराम मोरे वय ६५, राहणार वाधी धानोरा तालुका जिंतूर आणि नबीबाई प्रकाश पजई वय ४०, राहणार वाघी धानोरा, तालुका जिंतूर असे मयत महिलांची नावे आहेत. दिंडीप्रमुख देशमुख यांनी सकाळी माहूरच्या पोलिस ठाण्यात दोन महिला हरवल्याची माहिती दिली होती. काही वेळानंतर पांडवलेणी तलावाच्या काठावरून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. पोलिसांना फोनद्वारे माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या साहित्याची तपासणी केली.
मतदान कार्डमुळे ओळख: तलावाच्या किनाऱ्यावर महिलेचे मतदान कार्ड मिळून आले. मतदान कार्डावरील नावानुसार महिलेचे नाव फुलाबाई चीनकीराम मोरे असे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या महिलेसोबत तिची मुलगी नबीबाई प्रकाश पजई ही देखील सोबत होती. असे सोबत आलेल्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पोहणाऱ्यांनी तलावात पुन्हा पाहणी केली, तेव्हा दुसऱ्या महिलेचाही मृतदेह आढळला. मयत नबीबाई यांना तीन मुली आहेत. त्यांचे मतदान कार्ड तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या तिच्या साहित्यात भेटल्याने ओळख होण्यास मदत झाली. निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रीधर जगताप तपास करीत आहेत.