नांदेड- महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटुंबांसाठीची खावटी योजना पुन्हा सुरू केल्याने नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबियांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
1 मेपासून योजना होणार सुरू -
राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खावटी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.
प्रत्येक कुटुंबाना चार हजाराचा लाभ -
या खावटी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी ४ हजार रूपयांचा लाभ दिला जाईल. यामध्ये २ हजार रूपये किंमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू तसेच २ हजार रूपये रोख बॅंक खात्यामार्फत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्य स्तरावर सुमारे ४८२ कोटी रूपये खर्च केले जातील. प्रामुख्याने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
किनवट तालुक्याला सर्वाधिक लाभ -
नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासीबहूल किनवट तालुक्याला मिळणार असून, आजपर्यंत येथील ५ हजार १२७ अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७ तर भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.
मिळणारी रक्कम ही अनुदान स्वरूपात -
यापूर्वी खावटी कर्जरूपात दिली जायची व ते कर्ज नंतर परत करावे लागायचे. या योजनेमध्ये मिळणारी रक्कम हे अनुदान स्वरूपात असणार असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.