नांदेड- सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे तब्बल 125 कोटी 55 लाखाचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कोरोनामुळे गुरुद्वाराच्या उत्पन्न स्त्रोतांवर मोठा परिणाम होणार असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. या अनुषंगाने जगभरातील देणगीदारांना मदतीचे आवाहन करण्याचे ठरले.
गुरुद्वारा सचखंड बोर्डाची बैठक नियमाप्रमाणे कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भुपिंदरसिंघ मनहास होते. कोरोनाच्या संकटाने भाविक, पर्यटकांची संख्या घटू शकते, त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. यासाठी सर्वांनी गांभीर्याने विचार करावा, असे म्हणत देणगीदारांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मनहास यांनी केले.
बोर्डातर्फे जे नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, त्याची पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी, असेही मनहास त्यांनी सांगितले. या प्रस्तावित प्रकल्पात माता गुजरीजी यात्री निवास व इतर प्रकल्पांचा समावेश आगामी काळातील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन जगभरातील भाविक, दात्यांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळवाव्यात. सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करावी, असेही ठरले.