नांदेड - गेल्या १५ दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. आमचे सर्व मतभेद मिटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणेही झाले आहे. त्या दोघांनी मिळून मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खात्री आहे, की शिवसेना तन-मन-धनाने माझ्या सोबत राहील, असे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर म्हणाले. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्ह्यात भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांची ओळख आहे. चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या विषयावर पडदा पडला. उमेदवारी जाहीर होताच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.