नांदेड - जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करणारे भाजप गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 'ब्लॅकमेलर' असा उल्लेख केला होता. या विरोधात प्रशांत बंब यांनी चिखलीकर विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणारी नोटीस वकिलामार्फत बजावली आहे.
एका रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३३ कोटींची तरतूद केली होती. परंतु, या रस्त्याच्या कामाची निविदा भरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला असल्याने ही निविदा शासनाकडून रद्द करण्यात आली होती. मात्र, निविदा प्रक्रियेत पुन्हा हे काम त्याच कंपनीला नाव बदलून देण्यात आले. इतकेच नाही तर, ३३ कोटींचे काम ३५ कोटींवर गेले. या संदर्भात आमदार बंब यांनी आक्षेप नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून आमदार बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका असे म्हटले होते. तसेच आमदार बंब हे 'ब्लॅकमेलर' असल्याचा आरोपही चिखलीकरांनी केला होता.