नांदेड - धम्म परिषदेत येणाऱ्यांनी धम्म ज्ञानाचे आचरण करून आपले जीवन सुखी करावे. धम्म परिषदेच्या माध्यमातून तथागत गौतम बुध्दांचा धम्म प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत होते, असे मत आमदार अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले. त्या १६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी लहान (ता. अर्धापूर) येथील धम्म परिषदेत बोलत होत्या.
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे तपोवन बुध्दभूमित पूज्य भदंत कृपाशरण महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात सुरुवात झाली. यावेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, महापौर शिला भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. चव्हाण यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्धाटन करण्यात आले.