नांदेड : पूर्वी आपण कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रतिक्षेत होतो. आता लस आली. पण, लसीबाबत अनेक गैरसमजुतीचा मुलामा मनावर चढविण्यात आला आहे. जितक्या लोकांनी लस घेण्याची तयारी दाखविली, तितक्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत असली तरी या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या साधारणतः 33 लाखांच्या वर आहे. आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार ३१७ लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे. त्यामुळे सुरक्षित असलेली कोरोना लस सर्व पात्र नागरिकांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सर्व पात्र नागरिकांनी निसंकोचपणे कोरोना लस घ्यावी, डॉक्टरांचे आवाहन ४५ वर्ष वयावरील नागरिकांना लस घेण्याची मूभा
प्रथम फ्रंटलाईन, नंतर जेष्ठ नागरिक आणि आता ४५ वर्षावरील सर्वांसाठी लसीकरणाची दारे उघडी झाली आहेत. शासकीय रुग्णालयासोबत अनेक खाजगी रुग्णालयातूनही कोरोना लसीकरणाची सुविधा दिली जात आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर कोरोना लसीकरण केले जात आहे.
आतापर्यंत १ लाख २९ हजार ३१७ लोकांचे लसीकरण
प्रशासकीय स्तरावर लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तरीही काही गैरसमजुतीमुळे लस टोचून घेण्यास लोक धजावत नसल्याचे दिसून येत आहे. लोकांनी स्वतः होऊन लसीकरणासाठी सेंटरवर जाणे आवश्यक आहे. मात्र, लस घेणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३१७ लोकांनीच लस घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा -Anil Deshmukh Resignation LIVE : अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा
खूप मेहनतीने बनविलेली लस
कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग काही महिने ठप्प झाले होते. कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पण, कोरोनाच्या लढाईसाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यासाठी संशोधकांनी कठोर प्रयत्न करून लसही तयार केली. लसीच्या चाचण्या चालू होत्या. त्यावेळी म्हणजे सात महिन्यापूर्वी लस टेचून घेणारे बारडचे प्रा. रुपेश देशमुख बारडकर यांनीही याबाबीकडे लक्ष वेधले. आपल्याला कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल, लॉकडाऊन नको असेल; तर लसीकरण करून घेऊन स्वतःला व समाजाला सुरक्षित करा, असा सल्ला त्यांनी दिला. संशोधकांनी खूप मेहनतीने बनविलेली ही लस अगदी सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लसीकरणाला प्रतिसाद नगण्य
'सध्या आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. गावोगावी जाऊनही आम्ही लस देण्यासाठी लोकांना आवाहन करत आहोत. पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आहे. विहित कालावधीत लसीचे दोन डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे त्याला नंतर कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. जिल्ह्यात वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या लसी अगदी सुरक्षित आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे', असे आवाहन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्य संघटक डॉ. यु. एम. इंगळे यांनी केले आहे.
ग्रामीण भागात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस जिल्हा, तालुका स्तरावर; प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर उपकेंद्र आणि आता ग्रामीण स्तरावर लसीकरण शिबीरं सुरू आहेत. पण गावातील तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्तरावरील कर्मचारी, गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीक पुढाकार घेताना दिसून येत नाहीत. अशी खंतही व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?
हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांनी केला जगाचा अभ्यास; जयंत पाटलांची टीका