नांदेड - त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात नांदेड शहरासह महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे.
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाला हिंसक वळण हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे -
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.
परिस्थिती पूर्ण नियंत्रणात - जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे
त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले. यात ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्णक कायदा हातात घेऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.
नांदेड येथील भाईचारा कोरोना काळातही अतिशय संयमाने लोकांनी जपला आहे. तो भाईचारा आणि संहिष्णूता सर्व नांदेडकर मानवी एकतेला जपतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा घटनांमध्ये गोरगरीब व ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. परस्पर सहकार्याची भावना प्राधान्याने विचारात घेऊन सर्व नागरीक पुन्हा विश्वासाने जनजीवन सुरळीत सुरू करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड येथे अतिरिक्त पोलीस दलाची टिम व सुरक्षिततेच्या सर्व यंत्रणा तत्पर दाखल झाले असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले