नांदेड- केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आणून मोठ्यांचा फायदा केला आहे. या कायद्यामुळे मार्केट कमिट्या बंद पाडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. पंतप्रधान मोदी हे बहुमताच्या जोरावर 'हम करे सो कायदा' धोरण राबवित असून ही बाब योग्य नाही. आता शेतकरी व जनता त्यांना उत्तर देईल, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
बोलताना मंत्री अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'किसान अधिकार दिवस' साजरा करण्यात आला. नवामोंढा येथून गांधी पुतळा असा प्रतिकात्मक ट्रॅक्टर मोर्चा आणि महात्मा गांधी पुतळा तेथे सत्याग्रह करण्यात आला. त्याप्रसंगी मंत्री अशोक चव्हाण बोलत होते.
बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात बिल
देशाच्या नेत्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून एका रात्रीमध्येच बँकांचे राष्ट्रीयकरण करून आर्थिक पत उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची व्यवस्था झाली. परंतु, आज देशामध्ये बहुमताच्या जोरावर केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात बिल आणले. कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी? असा प्रश्न उपस्थित करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोउल्लेख करत टीका केली.
हेही वाचा -'मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण, अन्य समाजच्या आरक्षणमध्ये सामील करण्याचा कोणताही विचार नाही'
यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.