नांदेड - राज्यातील सरकार जरी तीन पक्षांचे असले, तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसारच चालत आहे. मात्र, केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत आहे की नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. ससंदेत केलेल्या कायद्याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे सध्या केंद्रातील सरकार घटनेप्रमाणे चालत नसून 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने चालत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. लहान (ता.अर्धापूर) येथील तपोवन बुध्द भूमीतील १७ व्या आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा... शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून व दुरदृष्टीतून संविधान निर्माण झाले आहे. संविधानामुळेच देश व राज्य टिकून आहे. राज्यातील नागरीकांना व तरूणांना संविधान समजावे, यासाठी प्रस्ताविकेचे वाचन राज्यात सुरू केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सरकार तीन पक्षांचे असले, तरी ते घटनेप्रमाणे काम करणारे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. धम्म परिसरातील वातावरण दिशादर्शक आहे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती व्हावी. तपोवन व परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.