नांदेड - येथील गोदावरी पात्रामध्ये लाखो मासे मृतावस्थेत पडून त्यांचा खच साचला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मासांच्या मृत्यूचे कारण काय आहे? अद्याप हे समजू शकले नाही. या पार्श्वमहापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदींनी या ठिकाणी भेट दिली. इतक्या मोठ्या संख्येने अचानक मासे का मेले असावे? याचे संशोधन करूनच माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात येतील, असे आयुक्त डॉ. लहाने यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसापासून गोवर्धनधाट, नगीनाधाट, शनिमंदिर घाट या भागातील नदीकाठी मासे मरुन पडले आहेत. या माशांची दुर्गंधी पसरू लागल्याने नदीपात्रातील पाणी दुषित झाले आहे. यापूर्वी मासे मरण पावल्याची घटना सिद्धनाथ, शंकतीर्थ, वासरी आणि आमदुरा या भागात घडली होती. त्याची पुनरावृत्ती शहरातील या संपूर्ण घाटावर पाहावयास मिळाली.
गोदावरी नदीपात्रात आढळले लाखो मासे मृत. अचानक मासे मरण्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन भोसले यांना गोदावरी नदी पात्रास भेट दिली. यासंदर्भात लवकरच माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.
गोदावरी नदीच्या अंतर्गत सफाई करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पर्यावरण विभागाकडून देण्यात आला. मात्र, अद्यापही शहरातील अनेक नाल्यांचे घाण पाणी नदीपात्रात सोडल्या जात आहे. नदीत सापडलेले मृत मासे छोटे आणि मोठ्या आकाराचे आहेत.
सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आयुक्त डॉ. लहाने, उपायुक्त संधू, प्रदूषण नियंत्रणचे पाटीलल घटनास्थळी दाखल झाले. दुपारी ३ वाजता संपूर्ण घाटाची त्यांनी पाहणी केली. गोदावरी पात्रात एवढे मासे असू शकत नाहीत. मृत मासे बाहेरुन वाहत आलेले असावेत, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. प्रशासनाकडून अधिकृत खुलासा करण्यात आला नाही.