महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marathwada Mukti Sangram Din २०२३ : कल्हाळीतील गढीवर स्वातंत्र्य सैनिकांनी फडकावला तिरंगा; तीन दिवस रझाकारांशी कडवी झुंज देताना 35 जण हुतात्मा

Marathwada Mukti Sangram Din 2023: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. या लढ्यात कंधार तालुक्यातील कल्हाळीच्या शौर्यगाथेचा उल्लेख महत्वाचा आहे. कल्हाळी गावातील गढीवर तिरंगा फडकावल्यानं रझाकारासोबत स्वातंत्र्य सैनिकांची लढत झाली. यावेळी 35 स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले.

Marathwada Mukti Sangram Din 2023
हुतात्मा स्मारक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 7:00 AM IST

नांदेड Marathwada Mukti Sangram Din 2023:मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याला ७५ वर्ष पूर्ण होतं आहेत. याच अनुषंगानं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जातं आहे. मराठवाडा निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे कल्हाळीच्या शौर्यगाथेचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. नाईकांच्या गढीवर तिरंगा फडकावण्यावरुन रझाकारांनी तीन दिवस बेछूट गोळीबार केला होता. कल्हाळीच्या ग्रामस्थांनी याचा प्रतिकार केला आणि नाईकांचा वाडा पेटवून देण्याचा रझाकारांचा मनसुबा हाणून पाडला. यात 35 स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य देखील आलं होतं.

वाड्याच्या गढीवर फडकावला तिरंगा :नांदेड जिल्ह्यात मन्याड खोऱ्याच्या दक्षिणेस डोंगरभागात कंधार तालुक्यात कल्हाळी हे गाव आहे. त्यावेळी या ठिकाणी नाईकांची जहागिरी होती. नाईक घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातील पाटवडा (काशीद) गावचं होतं. या घराण्याचे प्रमुख दत्ताजीराव गायकवाड, त्यांचे दोन पुत्र मानसिंहराव आण लक्ष्माजीराव यांनी मराठवाड्यातील पेठवडज- कल्हाळी येथील जहागिरी मिळवली. बापूसाहेब भगवंतराव नाईक व अप्पासाहेब नाईक हे सातव्या पिढीतील वंशज होते. हे दोघंही हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त व्हावं, या मताचे होते. अप्पासाहेब व माधवराव मरेवाड यांनी शत्रूशी मुकाबला कसा करावा, याचं प्रशिक्षण सहकाऱ्यांना दिलं. निजामाच्या पोलिसांची या सर्वांवर वक्रदृष्टी होती. तशातच त्यांनी एक दिवशी आपल्या वाड्याच्या गढीवर तिरंगा ध्वज फडकावला. ही बातमी मुखेडच्या फौजदाराला समजताच तो कल्हाळीला धावून आला. पोलिसांनी गढीवर गोळीबार केला.

नाईकांच्या वाड्याला गराडा घालून रझाकारांचा रात्रभर गोळीबार :28 जून 1947 रोजी मिलिटरीचे 500 जवान व 1500 रझाकारांनी कल्हाळीच्या दिशेनं आगेकूच केली. 23 जून 1947 ला पहाटे 5 वाजता नाईकांच्या वाड्याला गराडा घालण्यात आला. गढीत नाईकांनी आपल्या 80 साथीदारांसह आश्रय घेतला. गढीवरून लक्ष्मण बाबाराव वडजे व संभाजीराव टोळ यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. अनेक रझाकार ठार झाले. पिसाळलेल्या रझाकारांनी घरे पेटवली. 29 जून ते 1 जुलै 1947 पर्यंत रझाकारांशी मुकाबला चालू होता. रात्रभर गोळीबार होत होता. कोणीही मागं हटत नव्हतं. 7 जुलै 1947 रोजी मंगळवारी सकाळी 10 वाजता मिलिटरी व रझाकार यांनी गढीत प्रवेश मिळवला. समोरासमोरच्या लढाईत 35 जणांना हौतात्म्य प्राप्त झालं. अप्पासाहेब नाईकांना वीरमरण आलं, अशी माहिती सरपंच गणपथ तोटावाड यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा :

  1. Marathwada Mukti Sangram Day मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; काय आहे या दिनाचा इतिहास, जाणून घेऊया
  2. Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्याचा इतिहासाची एक झलक

ABOUT THE AUTHOR

...view details